UPI Payment Charges : मंगळवारच्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. यामध्ये NPCI च्या परिपत्रकाचा हवालानुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १.१% प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महागाईचा आणखी एक झटका एप्रिल महिन्यात देखील बसणार आहे. यूपीआय (UPI) द्वारे पैसे भरणे आता येत्या काही दिवसात महागणार असून UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी १ एप्रिलपासून तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
NPCI परिपत्रकानुसार ऑनलाइन व्यापारी, मोठे व्यापारी आणि लहान ऑफलाइन व्यापाऱ्यांनी केलेल्या दोन हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना १.१ टक्के इंटरचेंज फी भरावी लागेल.
अहवालामुळे उडाला गोंधळ
NPCI नुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर १.१ टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क आकारले जाईल, ही बातमी आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. प्रश्न असा आहे की, या निर्णयानंतर यूपीआय वापरकर्त्यांसाठी महाग होईल का? हा शुल्क सर्व प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटवर लादला जाणार आहे की कोणत्याही विशिष्ट विभागावर त्याचा परिणाम होणार आहे? असाही संभ्रम निर्माण झाला.
NPCI ने स्पष्टीकरण देत काय म्हटले?
अशा स्थितीत सामान्य नागरिकांचा गोंधळ दूर करत NPCI ने स्पष्टीकरण जारी केले आणि म्हटले की व्यापारी UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. एकूणच सामान्य नागरिकांना टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि तुम्ही कोणत्याही त्रास आणि काळजीशिवाय UPI पेमेंट करू शकता. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्यासाठी UPI पेमेंट पूर्णपणे मोफत असून तुमच्यासाठी काहीही बदलल झालेला नाही. UPI बँक हस्तांतरणामध्ये काहीही बदल झालेला नाही.
नवीन नियम फक्त Wallets/PPI साठी आहे. म्हणजे तुम्ही वॉलेटमधून दोन हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागू शकते. म्हणजेच तुम्ही वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे UPI पेमेंट केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागेल. हे शुल्क तुम्ही व्यापाऱ्याला केलेल्या एकूण पेमेंटच्या १.१% असेल.
NPCI ने आपल्या परिपत्रकात म्हटले की बँक खाती आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) दरम्यान पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-व्यापारी व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परिपत्रकात, P2P, P2M व्यवहारांवर याची अंमलबजावणी करू नका, असे म्हटले आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे दिले आणि पेमेंट पर्याय म्हणून बँक खाते निवडले, तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी UPI पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले.