आज-काल ग्रामीण भागात देखील शहरी भागाप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आजकाल सर्वसामान्य लोकांचा शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता रोजगारासाठी मजुरांची कमतरता भासत आहे.
त्यामुळेच ऊस तोडणी साठी कुशल अशा मजुरांची संख्या कमी होताना दिसत आहे. वेळेवर ऊसतोडी साठी मजूर उपलब्ध होत नसल्याकारणाने शेतकऱ्यांच्या उसाची ऊसतोड वेळेत होत नाही.
ऊस तोड वेळेत न झाल्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होते याचा फटका शेतकऱ्याला बसतो. म्हणूनच या अशा प्रकारची कमतरता भरून काढण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करून सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना (Sugarcane Harvester Subsidy) सुरू केली आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान (Sugarcane Harvester Subsidy)ही योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी महाडीबीटीच्या पोर्टलवर (Mahadbt Portal) जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान पात्रता-
1. शासन निर्णयाप्रमाणे ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी शेतकरी स्वतः,व्यावसायिक (Entrepreneur),सहकारी व खाजगी साखर कारखाने यांना अनुदान देण्यासाठी मान्यता दिली आहे.
2. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
3. सहकारी व खाजगी साखर कारखाने यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळेल.
4. ऊस तोडणी यंत्रासाठी यापूर्वी लाभार्थ्यास अनुदान प्राप्त झाले असल्यास लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ घेता येणार नाही.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे अटी व नियम-
- 1. शासनाकडून अधिसूचित केलेल्या ज्या यंत्र उत्पादक कंपन्या आहेत त्यांनीच बनवलेल्या यंत्रांपैकी एका ऊस तोडणी यंत्राची निवड लाभार्थ्याला करावी लागेल.
- 2. या योजनेअंतर्गत मिळालेल्या ऊस तोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यांमध्येच करणे बंधनकारक आहे.
- 3. ऊस तोडणी यंत्र मिळाल्यानंतर त्या यंत्रास काम मिळवण्याची जबाबदारी लाभार्थ्याचीच असेल.
- 4. यंत्राचे अनुदान मिळाले नंतर त्या यंत्राचे काही भाग नाही मिळाले तर ते लाभार्थी आणि यंत्र पुरवणारी कंपनी यांच्यामध्ये संगणमताचा करार हा लाभार्थ्यांनाच करावा लागेल.
- 5. ऊस तोडणी यंत्राचा वापर कसा करायचा? याचे प्रशिक्षण देण्याची जबादारी यंत्र पुरवठादार यांची राहील.
- 6. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्याने योग्य ते यंत्र खरेदी करावे.
- 7. अनुदान देण्यात आलेले यंत्र किमान 6 वर्ष तरी त्या यंत्राची विक्री करता येणार नाही,आणि तसे केल्यास देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम वसुली पात्र राहील. याबाबतचे पत्र लाभार्थ्याने साखर आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे.
- 8. अनुदान देण्यात येणाऱ्या ऊसतोड यंत्रावर लाभार्थ्याचे नाव,योजनेचे नाव,अनुदान वर्ष,अनुदान रक्कम इत्यादी माहिती कायमस्वरूपी तशीच राहील अशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे.
- 9. लाभार्थ्याने ज्या कंपनीचे यंत्र घ्यायचे आहे त्याच यंत्राचे डिटेल्स महाडीबीटी पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.अनुदान मिळाले नंतर वेगळ्या कंपनीचे यंत्र खरेदी करायचे असेल तर सहसंचालक यांची लेखी संमती घ्यावी लागेल.
- 10. महाडीबीटीवर निवड झालेल्या अनुसूचित जाती जमाती अशा प्रवर्गांच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
ऊसतोड नोंदणी यंत्र अनुदान या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किमतीच्या 40% किंवा 35 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थ्यास अनुदान म्हणून मिळेल.
या राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत ९00 शेतकऱ्यांना ऊसतोड यंत्र अनुदान देण्यात येणार आहे.